बेधडक कारवाई! अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडियासह तीन प्रतिष्ठानची तपासणी
By आशीष गावंडे | Published: May 15, 2024 10:37 PM2024-05-15T22:37:34+5:302024-05-15T22:38:16+5:30
नांदेड येथील कारवाईनंतर आयकर विभागाचा अकोल्याकडे मोर्चा
आशिष गावंडे, अकोला: आयकर विभागाने नांदेड येथे केलेल्या कारवाई नंतर त्यांचा मोर्चा अकोला शहराकडे वळविल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील आंगडिया सर्विस एजन्सीच्या कार्यालयासह इतर दाेन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला. या छापेमारीमुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
शहरातील जुना कापड बाजारात आंगडिया सर्विस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना कुरियर व इतर पार्सल सुविधा पुरविली जाते. बुधवारी सकाळी नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या एजन्सीच्या कार्यालयात छापा घातला. एजन्सी मार्फत होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाण व इतर व्यवहारांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत काही राेख रक्कम व नवरंग साेसायटीतील एका घरातून काही वस्तू आढळून आल्याचे बाेलल्या जात असले तरी त्याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही. यादरम्यान, सिंधी कॅम्पस्थित एका दाल मिल उद्याेजकाच्या घरी व याच उद्याेजकाच्या मालकीच्या असलेल्या एमआयडीसी व नवीन किराणा मार्केटमधील एका प्रतिष्ठानची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.
नांदेड प्रकरणाशी संबंध?
आयकर विभागाने १० मे राेजी नांदेड येथील एका फायनान्स कंपनी चालविणाऱ्या व्यावसायिकाच्या घरी व कार्यालयात छापेमारी केली असता, तीन दिवस चाललेल्या कारवाइत तब्बल १७० काेटी रुपयांचे घबाड समाेर आले. त्यानंतर लगेच अकाेल्यात आंगडिया सर्विस एजन्सीवर कारवाइ झाल्यामुळे या छापेमारीचा नांदेड प्रकरणाशी काही संबंध आहे का, याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत.
कागदपत्रे ताब्यात
आयकर विभागाने आंगडियाचे कार्यालय व दालमिल उद्याेजकाच्या प्रतिष्ठानमधून काही रजिस्टर, नाेंदवह्या आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन साहित्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.