पत्नीला पाहून शेरेबाजी केल्याचा जाब विचारल्याने फेरीवाल्यांनी पीएसआयला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 09:44 PM2018-12-04T21:44:46+5:302018-12-04T21:46:13+5:30
मुंबई - पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याचा राग मनात धरून सहा जणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच ...
मुंबई - पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याचा राग मनात धरून सहा जणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच केईएम रुग्णालयासमोर घडली. या पोलीस उपनिरीक्षकाला टॅक्सीतून अपहरण करत असताना गस्तीवरील पोलिसाची नजर पडली आणि त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चार फरार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष मोहनलाल शर्मा, रोहित मोहनलाल शर्मा, भोळा जोखालाल मौर्या आणि विजयकुमार प्रजापती अशी आज अटक केलेल्या चौघांची नावं आहेत.ही सर्व घटना येथील सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहे.
रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकचा भाऊ आजारी असल्याने त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावाला बघण्यासाठी उपनिरीक्षक पत्नीसह २४ नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालयात गेले. पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयासमोरील दुकानात गेले. या ठिकाणी जात असताना येथे उभ्या असलेल्या फेरीवाल्यांनी उपनिरीक्षकाच्या पत्नीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. पहिल्यांदा दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. पण फेरीवाल्यांची शेरेबाजी सुरूच होती. याबाबत उपनिरीक्षकाने यातील एका तरुणाला हटकले. यामुळे या तरुणासोबत असलेले इतर पाचही तरुण संतापले. त्यांनी उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर जवळच उभ्या असलेल्या टॅक्सीमध्ये या तरुणांनी उपनिरीक्षकाला कोंबले. टॅक्सीतून मारहाण करीत नेत असताना उपनिरीक्षकाने मदतीसाठी आरडाओरड केली. पादचाऱ्यांनी हे ऐकून जवळून जाणाऱ्या पोलिसाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिस मागावर असल्याचे कळताच चालकाने टॅक्सी थांबवली. उपनिरीक्षकाने संधी मिळताच या तरुणांच्या तावडीतून सुटका करून घेतली.