आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:10 AM2021-09-08T05:10:03+5:302021-09-08T05:10:29+5:30
शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले.
थिरुवनंतपुरम : तिरुवनंतपुरम येथील दहावीच्या विद्यार्थिनीने समाजमाध्यमावर भेटलेल्या मित्रांना ७५ तोळे सोने भेट म्हणून दिले. एशियानेट न्यूजनुसार, वर्षभरापूर्वी शिबीन नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये आर्थिक अडचणीत असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट वाचून विद्यार्थिनी (१५) शिबीनशी बोलली. त्यांची मैत्री झाली.
शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले. शिबीनने हे सोने विकले. घराचे नूतनीकरण केले. राहिलेले ९.८ लाख घरात ठेवले. सोने दिसेनासे झाल्यावर विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजिलाला अटक झाली.
विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, ७५ तोळे सोन्यापैकी ४० तोळे पलक्कडच्या दुसऱ्या तरुणाला दिले, त्याला ती इन्स्टाग्रामद्वारे भेटली. सोने मिळताच त्या तरूणाने इन्स्टाग्राम ब्लॉक केले, पण पोलीस हे मान्य करायला तयार नाहीत. आरोपींची चौकशी केल्यावर अधिक माहिती बाहेर येईल, असे ते म्हणाले.
७५ नव्हे २७ तोळेच दिले
nविद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, तिने एक वर्षापूर्वी शिबीनला सोने दिले होते. पोलिसांनी त्याच्या घरातून १० लाख रुपये जप्त केले.
nशिबीनने पोलिसांना मला तिने ७५ नव्हे, तर २७ तोळे सोने दिले, असे सांगितल्यावर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.