सोशल मीडियावरुन पडले प्रेमात; पळून जाताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:06 PM2021-09-06T18:06:42+5:302021-09-06T18:11:58+5:30
Lovers Caught in Police Trap : दोघे गावाकडे पळून जाताना ३ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
डी. ए. कांबळे
हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : मोबाईलवरील सोशल मीडियावरुन एका बिहारी तरुणाची अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाच्या आणाभाका घेत तो तरुण मुलीच्या गावी पाेहोचला. त्यानंतर दोघे गावाकडे पळून जाताना ३ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही चित्रपटात घडावी अशी घटना उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी सांगितले, बिहार राज्यातील पाटणा येथील सुरज सुधीर वर्मा (२३) या तरुणाची सोशल मिडियावरुन वाढवणा बु. हद्दीतील एका गावातील १५ वर्षीय मुलीसोबत ओळख झाली. त्यांची मोबाईलवर चॅटिंग सुरू झाली. मोबाईलवरील खेळातून ते एकत्र येऊ लागले. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्या तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यामुळे तीही तयार झाली. त्यामुळे तो पाटण्याहून मुंबई (कुर्ला), पनवेल व तेथून रेल्वेने उदगीरला पोहोचला. उदगीरहून मोबाईलवरून मुलीच्या गावचे लोकेशन मिळाल्याने १ सप्टेंबर रोजी रात्री तो मुलीच्या गावात पोहोचला. त्यानंतर ते दोघे लातूररोड येथे गेले आणि तेथून नांदेड-पूर्णा-किनवट मार्गे पूर्णा- पाटणा रेल्वेने बिहारला जात होते.
दरम्यान, २ सप्टेंबर रोजी वाढवणा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने वाढवणा पोलिसांनी तपास सुरू केला. अपहृत मुलीस बिहार राज्यातील सुरज वर्मा याने पळवून नेल्याची माहिती मिळाली. वाढवणा पोलिसांनी सायबर शाखेला त्या तरूणाच्या मोबाईलच्या क्रमांकाचे लोकेशन शोधण्यास सांगितले असता किनवट परिसरात असल्याचे दिसून आले. त्यामुळे तात्काळ वाढवणा बु. ठाण्याचे सपोनि. नौशाद पठाण यांनी मुलीचा फोटो किनवट पोलिसांना पाठवला आणि येथील कर्मचाऱ्यांचे पथक किनवटकडे पाठवले. किनवट पोलिसांच्या मदतीने वाढवणा पोलिसांनी आरोपी व मुलीस किनवट रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.
आंजर्ले येथे बोट बुडाली, सुदैवाने मच्छीमारांनी पोहून गाठला किनाराhttps://t.co/M1ykFhAbpp
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी...
सदरील आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, असे वाढवणा (बु.) ठाण्याचे सपोनि. नौशाद पठाण यांनी सांगितले.
महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेहhttps://t.co/8Car50QUJD
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021