धक्कादायक! नालासोपाऱ्यात सापडले स्त्री अर्भक; पालकांचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 06:10 PM2022-08-24T18:10:35+5:302022-08-24T18:10:55+5:30
तुळींज पोलिसांनी केला गुन्हा दाखल, स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. त्याला लागलीच तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
मंगेश कराळे
नालासोपारा - नालासोपाऱ्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अंबावाडी रोडवरील एका टेंपोमध्ये नुकतेच जन्मलेलं स्त्री जातीचं नवजात अर्भक आढळल्याची घटना घडली आहे. या परिसरात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संतोष राजपूत (४७) यांना हे अर्भक आढळून आले. त्यांनी तुळींज पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पालकांचा शोध सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संतोष राजपूत (४७) हे त्यांच्या कुत्र्याला बाहेर फिरण्यासाठी घेऊन आले होते. त्यावेळी अंबावाडी रोडवरील शादी डॉट कॉम हॉलसमोरील उभ्या असलेल्या मालवाहू तीन चाकी टेंपोमध्ये कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक टाकून देण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्परता दाखवत तुळींज पोलीस ठाण्यात संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी जाऊन पहाणी केली. स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. त्याला लागलीच तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या स्त्री अर्भकाला नेमके कुणी या परिसरात सोडले याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
अनैतिक संबंध लपवण्यासाठी
सदरचे नवजात स्त्री अर्भक अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले असावे. हे संबंध लपवण्यासाठी संबंधित महिलेने हे अर्भक परिसरात सोडून दिले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या अर्भकास असे बेवारसपणे सोडणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.
सदर प्रकरणी आरोपी पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत पुढील तपास करत आहे. - राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)