महिला-पुरुषाची मालाडमध्ये आत्महत्या; पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:05 AM2022-06-06T06:05:25+5:302022-06-06T06:05:54+5:30
Suicide News : या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
मुंबई : मालाड पश्चिम परिसरात रविवारी संध्याकाळी एका महिलेसोबत पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती रणजितसिंह कैलास यादव (३३) हे प्रदीपकुमार दुर्गाप्रसाद शुक्ला यांच्या कारवर चालक म्हणून २ मेपासून रुजू झाले होते. यादव यांना २९ मे रोजी अंगावर पुरळ उठल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात गेले होते. तेथून ३ जून रोजी गुड्डीदेवी मुन्नालाल हरजन (३५) हिला उत्तर प्रदेश येथून घेऊन आले आणि वळणाई येथील शिवगामीनगरमध्ये खोली भाडेतत्त्वावर राहत होते. त्यानंतर ५ जून रोजी रात्री ते दोघे मूळ गावी जाणार होते. त्यामुळे शुक्ला त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दुपारी त्यांच्या खोलीकडे आले. त्यांनी बऱ्याच वेळा दरवाजा वाजवूनदेखील यादव यांनी दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
तेव्हा पोलिसांनी दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून आत प्रवेश केला. तेव्हा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत यादव आणि हरजन त्यांना दिसले. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी तपासून दाखल मृत घोषित केले.
विवाहबाह्य संबंध
मयत स्त्री आणि पुरुष हे विवाहित असून त्यांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध होते. त्यानुसार त्यांनी आत्महत्या का केली याची चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नेमके कारण काय असावे याची चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू आहे.