कुंपणच शेत घातंय! अपघातातील वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबलने घेतली १५ हजाराची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 04:15 PM2021-01-11T16:15:23+5:302021-01-11T16:34:05+5:30
Bribe Case : पाळधी दूरक्षेत्राचा कर्मचारी जेरबंद : सहायक निरीक्षकाचा आहे रायटर
जळगाव : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुमीत संजय पाटील (२७,रा.निवृत्ती नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजता पाळधी दूरक्षेत्रातच पकडण्यात आले. दरम्यान, पाटील हा दूरक्षेत्राचे प्रमुख सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा रायटर आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. या अपघाताच्या गुन्ह्यात वाहन ताब्यात घेण्यात आलेले असून या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे व वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबल सुमीत पाटील याने २९ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. ठाकूर व सहकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आले.
दूरक्षेत्रातच रचला सापळा
लाचेच्या मागणीनंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील,मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांनी सोमवारी पाळधी दूरक्षेत्रातच सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्विकारताच सुमीत पाटील याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे.