फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:34 AM2019-02-07T03:34:07+5:302019-02-07T03:34:27+5:30
दारू पिण्यासाठी २०० रुपये देण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार रबाळेत घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : दारू पिण्यासाठी २०० रुपये देण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार रबाळेत घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वरनगर येथे राहणाऱ्या विनयकुमार गुप्ता (३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा हातगाडीचा व्यवसाय असून त्यावर ते कांदे, बटाटे व नारळ विक्री करतात. त्यानुसार नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री हातगाडी लावून व्यवसाय करत असताना परिसरातच राहणारा मंगेश नावाचा तरुण त्या ठिकाणी आला. त्याने विनयकुमारकडे दारू पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. मात्र, दिवसभर धंदा कमी झाल्याचे सांगून विनयकुमार यांनी त्यास २०० रुपये देण्यास नकार दिला. याचाच मनात राग धरून थोड्या वेळातच मंगेश व त्याच्यासोबत इतर तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांनी विनकुमारला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. या वेळी त्यानेही प्रतिकार केला असता, प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे भांडण सोडवले. मात्र, या प्रकारात विनयकुमार यांना गंभीर दुखापत झाली असून घटनेनंतर त्यांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.