मावळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक; महिलेला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By नारायण बडगुजर | Published: August 29, 2024 09:00 PM2024-08-29T21:00:12+5:302024-08-29T21:00:47+5:30

रविकांत याची मैत्रीण कविता गायकवाड हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळली.

Fifth suspect arrested in Maval triple murder case; Woman in police custody till September 2 | मावळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक; महिलेला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

मावळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक; महिलेला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : मावळ तालुक्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी यापूर्वी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात गुरुवारी (दि. २९) आणखी एका महिलेला अटक करण्यात आली. तिला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली.

कविता शैलेंद्र गायकवाड (३७, रा. अहमदनगर), असे गुरुवारी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. वराळे, तळेगाव दाभाडे), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. अहमदनगर), डाॅ. अर्जून शिवाप्पा पोळ (६९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) तसेच उषा निवृत्ती बुधवंत (३५, रा. कोपरखैरणे) यांना अटक केली आहे. समरीन निसार नेवरेकर (वय २५) आणि ईशांत (वय ५), इजान (वय २) अशी हत्या झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र दगडखैर याने ६ जुलै रोजी समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी आपसात संगनमत करून ९ जुलै रोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव येथील वराळे येथे आणले. इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ‘प्लॅन’ त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम संशयितांनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र, रविकांत, तसेच गर्भपात करणारा डाॅक्टर अर्जून पोळ आणि गर्भपातासाठी मध्यस्थी करणारी महिला उषा बुधवंत यांना अटक केली. 

दरम्यान, रविकांत याची मैत्रीण कविता गायकवाड हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळली. तसेच पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हत्येच्या या कटात तिचा सहभाग असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी (दि. २९) तिला अटक करून न्यायालयात हजर केले. 

मृतदेह पुरले?

दरम्यान, पोलिसांनी समरीन आणि तिच्या मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. पथकाने तळेगाव ते उजनी धरणापर्यंत इंद्रायणी नदीकाठच्या सर्व पोलिस ठाण्यांना मृतदेह शोधण्याबाबत माहिती दिली. मात्र, शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलवत संशयितांच्या अहमदनगर येथील मूळगावी शोध घेतला. शेतात आणि इतर काही ठिकाणी मृतदेह पुरले असण्याची शक्यता व्यक्त करत जेसीबीच्या साह्याने खोदून मृतदेहांचा शोध घेण्यात आला. मात्र, मृतदेह मिळून आले नाहीत.

Web Title: Fifth suspect arrested in Maval triple murder case; Woman in police custody till September 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.