आमदाराच्या घराचे आमिष दाखवून पन्नास लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:53 AM2019-06-28T02:53:47+5:302019-06-28T02:54:05+5:30
आमदारांसाठी म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या वर्सोवा-लोखंडवाला येथील एका इमारतीतील घर मिळवून देण्याच्या बहाण्याने एका दलाल महिलेने जुहूतील एका महिलेला पन्नास लाखांचा गंडा घातला आहे.
मुंबई - आमदारांसाठी म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या वर्सोवा-लोखंडवाला येथील एका इमारतीतील घर मिळवून देण्याच्या बहाण्याने एका दलाल महिलेने जुहूतील एका महिलेला पन्नास लाखांचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्या या महिलेने खेरवाडी पोलीस ठाणे आणि म्हाडाच्या दक्षता विभागाकडे धाव घेतली आहे.
सांताक्रूझ पश्चिमेमध्ये रूपल जैन यांच्या मालकीचे स्पा अॅण्ड सलून आहे. या सलूनमध्ये पौर्णिमा पेंडके नियमित येत होत्या. यामुळे रूपल आणि पौर्णिमा यांच्यामध्ये मैत्री जमली. पौर्णिमा यांनी रूपल यांना लोखंडवाला येथील म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याचे कबूल केले. पौर्णिमा यांनी रूपल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी लोखंडवाला येथील राजयोग सोसायटीतील पंधराव्या मजल्यावरील घर दाखवले. या ठिकाणी एका व्यक्तीला बोलावून तो म्हाडाचा मोठा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. आमदारांना पैशांची गरज असल्याने ते हा फ्लॅट स्वस्तात विकत असल्याचे पौर्णिमा यांनी सांगितल्याची माहिती रूपल यांनी दिली.
पौर्णिमा यांनी त्यांच्याकडे म्हाडाचे लायसन्स असून म्हाडाचे अनेक अधिकारी चांगल्या ओळखीचे असल्याचे रूपल यांना सांगितले. स्वस्तातील घरासाठी पौर्णिमा यांना साठ लाख रुपये देण्याचे कबूल केल्याचे रूपल यांनी सांगितले. यानुसार पहिल्यांदा तीस लाख आणि दुसऱ्या वेळेस वीस लाख देण्यात आले. मात्र अनेक महिने घराची चावी न मिळाल्याने तगादा लावल्यानंतर पौर्णिमा यांनी मी सर्व पैसे म्हाडा अधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी दिल्यावर पैसे परत करण्यात येतील, असे पेंडके यांनी सांगितल्याचे रूपल यांनी सांगितले. वारंवार विचारणा केल्यावर २७, २९ आणि ३० मार्चला बँक आॅफ महाराष्ट्रचे धनादेश देण्यात आले. मात्र ते न वटल्याने पुन्हा मागणी केली असता दम भरण्यात आल्याचे रूपल यांनी सांगितले. तसेच म्हाडा अधिकारी, मंत्रालय, मुख्यमंत्री आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आपली ओळख असल्याची धमकी पेंडके यांनी द्यायला सुरुवात केली़
मुख्यमंत्र्यांशी ओळख असल्याची धमकी
वारंवार विचारणा केल्यावर २७, २९ आणि ३० मार्चला बँक आॅफ महाराष्ट्रचे धनादेश देण्यात आले. मात्र ते न वटल्याने पुन्हा मागणी केली असता दम भरण्यात आल्याचे रूपल यांनी सांगितले. तसेच म्हाडा अधिकारी, मंत्रालय, मुख्यमंत्री आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आपली ओळख असल्याची धमकी पेंडके यांनी द्यायला सुरुवात केल्याचे रूपल यांनी सांगितले.