पिपळा ग्रामसभेत हाणामारी : राजकीय वैमनस्य उफाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:50 AM2020-01-28T00:50:56+5:302020-01-28T00:53:10+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने प्रजासत्ताक दिनी या भागात दिवसभर वातावरण गरम होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने प्रजासत्ताक दिनी या भागात दिवसभर वातावरण गरम होते.
प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामसभा सुरू झाली. त्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी एका मुद्यावरून प्रल्हाद पोटभरेंचा सुधाकर बेलेकर, वासुदेव भोयर आणि अभय भोयरसोबत वाद झाला. तो वाढला अन् या तिघांनी प्रल्हाद पोटभरेंना मारहाण केली. यावेळी तेथे असलेल्या माजी सरपंच तसेच प्रॉपर्टी डीलर वैशाली किशोर वानखेडे यांनी वाद शांत करण्यासाठी मध्यस्थता केली. त्यामुळे आरोपी बेलेकर आणि भोयर संतप्त झाले. त्यांनी नत्थू भोयर, विक्की भोयर, संजय भोयर, तुषार भोयर, अभिषेक भोयर, अरुण भोयर, स्वप्निल भोयर, रोहित भोयर, सौरभ भोयर, बंडू चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी वानखेडे यांच्या कार्यालयात सायंकाळी धाव घेतली. कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. तेथे काम करणारे ज्ञानेश्वर खडसे यांना मारहाण करून कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना वासुदेव आणि ज्ञानेश्वर खडसे हे दोघे जखमी झाले. दरम्यान, कार्यालयात हल्ला झाल्याचे कळाल्याने वैशाली आणि किशोर वानखेडे तेथे पोहचले असता, आरोपींनी त्यांनाही कार फोडण्याची आणि मारण्याची धमकी दिली. माहिती कळताच हुडकेश्वर पोलीस गावात पोहचले. त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना पोलीस ठाण्यात नेले. तेथे दोन्हीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. पोलिसांनी वैशाली वानखेडे यांच्या तक्रारीवरून भोयर आणि
साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गावात तणाव
या प्रकारामुळे पिपळा गावात रविवारपासून प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तेथे काही वेळेपर्यंत बंदोबस्त लावला होता, मात्र नंतर तो काढून घेतला. त्यामुळे गावात तणावासोबतच दहशतही आहे.