डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेले पोस्टर्स फाडल्यावरून राडा, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:00 PM2022-04-19T20:00:09+5:302022-04-19T20:03:08+5:30
Crime News : सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांनी घटनेचे गांभीर्य बघून नशेत कृत्य करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : आशेळपाड्यात लावण्यात आलेले जयंतीचे पोस्टर्स फाडल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शेकडो जणांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांनी घटनेचे गांभीर्य बघून नशेत कृत्य करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळे पाडा येथील मोकळ्या जागेत जय शिवराय मित्र मंडळानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोस्टर्स लावले होते. रविवारी रात्री काही तरुण गप्पा मारीत होते. दरम्यान भालचंद्र उर्फ अचू बाळाराम पाटील याने पोस्टर्स शेजारी गप्पा मारीत असलेल्या मुकेश याला फोन करुन गाडी घेवुन ये. असे सांगितले. परंतु माझ्याकडे गाडी नसल्याचे उत्तर दिले. याचा राग भालचंद्र याला आला. त्याने गप्पा मारत असलेल्या मुकेशसह इतर मुलांकडे येऊन दारूच्या नशेत जातीवाचक शिवीगाळ करून जयंती निमित्त लावण्यात आलेले. पोस्टर्स फाडून टाकले.
याप्रकारची माहिती परिसरात पसरताच शेकडो नागरिक घरा बाहेर येऊन त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले. जयंती निमित्त लावण्यात आलेले पोस्टर्स फाडल्या प्रकरणी व मुलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी घटनेचे गंभीर्य ओळखून पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या शेकडो जणांना शांत करून घरी पाठवून दिले. तसेच घटना झालेल्या ठिकाणी काही काळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच नशेत जातीवाचक शिवीगाळ व पोस्टर्स फाडल्या प्रकरणी अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून भालचंद्र उर्फ अचू पाटील याला अटक केली. पुढील तपास स्वतः सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड करीत आहेत.