तारापूरच्या विराज कंपनीत तुंबळ हाणामारी; १० पोलिसांसह कामगार जखमी, मोठा बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 09:30 PM2022-05-07T21:30:25+5:302022-05-07T22:21:05+5:30
कारखान्यातील मालमत्तेचे व कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करण्यात आले.
बोईसर : स्टील उत्पादनात नामवंत समजल्या जाणाऱ्या विराज ग्रुपच्या तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या कारखान्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या हाणामारीत बोईसर पोलीस ठाण्यातील सुमारे १० पोलीस तर काही कामगारही जखमी झाले आहेत. खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विराज ग्रुपच्या तारापूर येथील विविध प्लांटमध्ये सुमारे १० हजार कामगार काम करीत असून दि. १६ मे पासून मुंबई लेबर युनियनने बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे कारखान्यातील वातावरण काही दिवसांपासून गंभीर असल्याचे समजते. शनिवारी अचानक उफाळलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यामध्ये कारखान्यातील मालमत्तेचे व कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करण्यात आले असून पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही कामगार जखमी झाल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. परंतु यामध्ये निश्चित किती कामगार जखमी झाले ते समजले नाही. तर जखमी पोलिसांना तुंगा रुग्णालयात दाखल केले असून जखमी पोलिसांची संख्या वाढण्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.