बनावट विक्रमशिला विद्यापीठ बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 06:12 AM2022-05-13T06:12:09+5:302022-05-13T06:12:19+5:30
अमरदीप सिंहच्या ठिकाणांवर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विक्रमशिला विद्यापीठाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या अमरदीप सिंह याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यासाठी त्याचे घर व कार्यालयावर छापे मारले. परंतु, तो हाती लागला नाही.
एका आयटी कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करणाऱ्या अमरदीपने विक्रमशिला विद्यापीठाची वेबसाईट बनवून हजारो करोडचे टेंडर काढले होते. या टेंडरच्या गॅरंटीसाठी त्याने कोट्यवधी रुपये उकळले.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात ५०० कोटींचे विक्रमशिला केंद्रीय विद्यापीठ बनविल्याची घोषणा केली होती. सातव्या शतकातील पाल वंशाचा राजा धर्मपाल यांनी स्थापित केलेले विद्यापीठ बख्तियार खिलजीने ११९३ मध्ये नष्ट केले होते.
‘लोकमत’ने केला पर्दाफाश
हजारो, करोडोच्या या फसवणुकीचा पर्दाफाश ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजी केला होता. पंतप्रधान कार्यालय व राष्ट्रपती भवनात याबाबत लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे कारवाईसाठी पाठवली होती.