कडवविरुद्ध बजाजनगरात पुन्हा एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:02 PM2020-07-11T22:02:30+5:302020-07-11T22:04:00+5:30
पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुख्यात कडव यांनी राजकीय पद, नोकरी, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केलेली आहे.त्यामुळे त्याची कुंडली बाहेर काढली आहे. कडव विरुद्ध मालमत्ता बळकावणे, खंडणी वसूलणे असेही अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्याचा कसून तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडवचा तपास सुरू आहे. या तपासात पोलीस उपायुक्त राजमाने स्वत: विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या तक्रारी आणि प्रकरण पोलिसांना मिळाली आहेत. कडवच्या पापाचा घडा पोलिसांनी फोडल्याचे लक्षात आल्यामुळे ठिकठिकाणचे पीडित तक्रारी दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेत येत आहेत. पारशिवनीचे अजय बाबाराव शेंदरे यांनीही दोन दिवसापूर्वी उपायुक्त राजमाने यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत सांगितली. मंगेश कडवने बजाजनगरमध्ये सदनिका देतो, अशी थाप मारून आपल्या कडून २५ लाख रुपये घेतले होते. आता दीड- दोन वर्षे झाले तरी त्याने ही सदनिका दिली नाही आणि आपली रक्कमही परत केली नाही. तो आपल्याला स्वत: आणि गुंडामार्फत जीवे मारण्याच्या धमक्या देतो, असेही ही शेंदरे यांनी सांगितले. त्यांच्याकडे असलेले पुरावे लक्षात घेऊन उपायुक्त राजमाने यांनी बजाजनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
दोन पोती फाईल मिळाल्या
कुख्यात कडवच्या भरतनगरातील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पोती भरेल इतकी कागदपत्रे मिळाली. त्यात मालमत्तेचे मजकूर लिहिलेल्या अनेक फाईल्स आहेत. कोरे स्टॅम्प, चेक आणि वेगवेगळ्या व्यक्तीकडून नोकरीसाठी लिहून घेतलेल्या अर्जाचाही यामध्ये समावेश आहे.
सहावा गुन्हा
बजाजनगरचा दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे आता कडवविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर, सीताबर्डी आणि हुडकेश्वरमध्ये वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झालेले आहेत.