५०० हुन अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शेठजी विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 08:26 PM2020-09-26T20:26:00+5:302020-09-26T20:26:46+5:30
बेकायदा भिशी चालवून तसेच कमी कालावधीत दामदुपट्ट रक्कम देतो अशी बतावणी करून केली फसवणूक..
उरुळी कांचन : बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडीसह पूर्व हवेलीमधील पाचशेहुन अधिक "बड्या" गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हिरेन भरतकुमार जोशी या "शेठ" सह त्याच्या दोन नातेवाईकांनी बेकायदा भिशी चालवून तसेच कमी कालावधीत दामदुपट्ट रक्कम देतो अशी बतावणी करून फसवणूक केली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसात पहिला गुन्हा शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर येथील गोदाम व्यावसायिक ज्ञानेश्वर नारायण काळभोर (वय- ५५ वर्षे, रा. धुमाळ मळा रोड, लोणी काळभोर, ता.हवेली) यांनी हिरेन भरतकुमार जोशी याच्यासह, वडील, भरतकुमार चरणदास जोशी व भाऊ दिपक भरतकुमार जोशी ( रा. तिघेही, उरुळी कांचन ता. हवेली) यांच्या विरोधात भिशीमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे.
भरतकुमार यांनी आपल्या मुलांशी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या कुंटुंबियाला त्यांच्याकडे ७ वर्षांच्या कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. तसाच त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ९९,७९,७५०/- रू घेत कुठलाही परतावा न देता विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या व कमी कालावधीत रक्कम दामदुपट्ट देतो या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पुर्व हवेलीमधील पाचशेहुन अधिक "बड्या" गुंतवणुकदारांच्याकडुन दोनशे कोटीहुन अधिक रुपयांची माया गोळा करुन पलायन केल्याबाबतची बातमी लोकमतने ४ दिवसापुर्वी प्रसिध्द केली होती.
हिरेन जोशी हा मागील सात वर्षापासुन उऱुळी कांचन व परीसरात बेकायदा भिशीचा व्यवसाय चालवत आहे. भिशीत पैसे लावल्यास, सदर पैशावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवल्याने पुर्व हवेलीमधील अनेकांनी जोशी यांच्याकडे कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. सुरुवातीला गुंतवणुकदारांना परतावा वेळच्यावेळी मिळत होता. मात्र मागील काही दिवसापासुन परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणुकदारात मोठी खळबळ उडून आपले पैसे बुडाल्याची भावना निर्माण झाली होती. गुंतवणुकदार वसुलीसाठी घरी येत असल्याचे लक्षात येताच शेठ व त्याच्या घरातील सदस्यांनी पलायन केले.
याबाबत अधिक माहिती देताना, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, भिशीचालक जोशी कुटुंबातील तिघांविरोधात गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जोशी कुटुंबीयांनी वरील फसवणुक मागील सात वर्षाच्या काळात केलेली आहे. जोशी याच्या विरोधात आणखी काही जणांनी लेखी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत.