नागपुरातील वादग्रस्त बिल्डर डांगरेविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 07:43 PM2020-07-07T19:43:36+5:302020-07-07T19:44:48+5:30
डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची बतावणी करून शहरातील चौघांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारे बिल्डर विजय तुळशीराम डांगरे (रा. आनंदनगर) यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची बतावणी करून शहरातील चौघांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारे बिल्डर विजय तुळशीराम डांगरे (रा. आनंदनगर) यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हिरा यशवंत दलाल (वय ६६,रा. जयंती मेन्शन, बेलतरोडी) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
हिरा दलाल, प्रदीप निळकंठ खोडे, राजीव ज्ञानेश्वर मेंघरे आणि रमेश नागोराव पिसे अशी या प्रकरणातील फसवणूक झालेल्या पीडितांची नावे आहेत. दलाल यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बिल्डर विजय डांगरे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा चिखली खुर्द येथे खसरा नंबर २७/१ मध्ये २ पॉर्इंट ८९ एकरात स्वराज्य पार्क नावाची बंगलो स्किम १९९५ मध्ये सुरू केली होती. येथे फिर्यादी दलाल, खोडे, मेंघरे आणि पिसे यांनी बंगलो बुक केले. त्यापोटी डांगरे यांना २ कोटी ४ लाख २४ हजार रुपये दिले. विशेष म्हणजे, ही जमीन डंपिंग यार्डसाठी आरक्षित होती; मात्र ग्राहकांपासून हे वास्तव लपवून आणि ग्राहकांपासून रक्कम घेतल्यानंतर सरकारी आरक्षणातून जमीन मुक्त न करता प्रस्तावित ६४ बंगल्यांची स्कीम बिल्डर डांगरे यांनी घोषित केली होती. त्यासंबंधी नागपूर सुधार प्रन्यासकडून आवश्यक ती मंजुरी नसताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंगल्याचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर बंगल्याचे बांधकाम पूर्ण न करता उपरोक्त चौघांची फसवणूक केली.
ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर दलाल, खोडे, मेंघरे आणि पिसे यांनी आपली रक्कम डांगरे यांच्याकडे परत मागितली. मात्र रक्कम परत न देता त्यांना डांगरे यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही तक्रार बरेच दिवस चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी थंडबस्त्यात टाकली होती. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी हुडकेश्वर पोलिसांना या प्रकरणी फसवणूक करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून डांगरे यांचे हे प्रकरण चर्चेत आहे. या संबंधाने कोर्टकचेरीही झाली आहे. ठरल्याप्रमाणे डांगरे यांनी पीडितांना त्यांची रक्कम परत न देता धमक्या देऊन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापूर्वी सक्करदरा पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.