सदनिका विक्रीत शिक्षिकेची फसवणूक करणाऱ्या जांगीड बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:12 PM2021-11-25T21:12:06+5:302021-11-25T21:13:10+5:30
Filed a case against Jangid Builder : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या फरहत अफशान नियाज अहमद (५१) यांनी मोठे घराची निकड असल्याने २०११ साली मीरारोडच्या कनकीया भागातील जांगीड बिल्डरच्या जांगीड एन्क्लेव्ह गृहप्रकल्पातील ऍस्टर इमारतीत सदनिका घेतली.
मीरारोड - सदनिकेची पूर्ण रक्कम घेऊन देखील गेली ९ वर्ष सदनिका न देणाऱ्या मीरारोडच्या जांगीड ह्या वादग्रस्त विकासकाच्या तिघा जणा विरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात एका फसवणूक झालेल्या शिक्षिकेच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या फरहत अफशान नियाज अहमद (५१) यांनी मोठे घराची निकड असल्याने २०११ साली मीरारोडच्या कनकीया भागातील जांगीड बिल्डरच्या जांगीड एन्क्लेव्ह गृहप्रकल्पातील ऍस्टर इमारतीत सदनिका घेतली. त्यावेळी ६२ लाख ४२ हजार अशी रक्कम निश्चित होऊन २०१२ साली नोंदणीकृत करारनामा विकासकाने करून दिला . त्यावेळी त्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंत सदनिकेचा ताबा देणार असे आश्वासन दिले होते . सप्टेंबर २०१३ पर्यंत फरहत यांनी सदनिकेची ठरलेली सर्व रक्कम अदा केली . ओमप्रकाश जांगीड , पुरषोत्तम जांगीड , लिलाराम जांगीड आणि अमृत जांगीड असे भागीदार होते . परंतु विकासकाने मात्र सदनिका देण्यास टाळाटाळ चालवल्याने २०१६ साली राज्य ग्राहक मंचा कडे तक्रार केली . तेथे विकासकाने २०१७ पर्यंत सदनिकेचा ताबा देतो असे आश्वासन दिले तसेच ताब्यास उशीर झाल्याने ११ लाख रुपये व्याज देण्याचे ठरले व तसा करारनामा केला गेला.
पण त्या नंतर देखील जांगीड बिल्डरने सदनिका न दिल्याने त्यांनी महारेरा कडे जानेवारी २०२० मध्ये तक्रार केली. तेथे देखील विकासका विरुद्व आदेश आले . परंतु त्या नंतर देखील सदनिका न दिल्याने सोमवारी फरहत यांच्या फिर्यादी वरून ओमप्रकाश जांगीड , पुरषोत्तम जांगीड आणि अमृत जांगीड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जांगीड बिल्डरने अश्या प्रकारे अन्य अनेकांना फसवले असून मीरारोड पोलीस ठाण्यात या आधी देखील गुन्हा दाखल आहे.