शिवसेना खासदारासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 09:22 PM2020-12-29T21:22:35+5:302020-12-29T21:23:17+5:30
Crime News : सोमवारी येथील स्टेट बॅंक चौकात शिवसेनेने पीक विम्याच्या मुद्यावर आंदोलन केले. त्यानंतर इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कार्यालयात खासदार गवळी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले.
यवतमाळ: पीक विमा काढणाऱ्या इफ्को टोकियो कंपनीच्या स्थानिक कार्यालयात चर्चेदरम्यान गोंधळ घालणे, व्यवस्थापकाच्या अंगावर सोयाबीन फेकणे, कॉलर पकडून थापड मारणे या प्रकरणात शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्यासह दहा जणांविरुद्ध यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
सोमवारी येथील स्टेट बॅंक चौकात शिवसेनेने पीक विम्याच्या मुद्यावर आंदोलन केले. त्यानंतर इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कार्यालयात खासदार गवळी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांनी कंपनीचे पुणे येथील मुख्य व्यवस्थापक सचिन सुरवसे यांच्या अंगावर सोयाबीन फेकले. हाताने थापड मारुन शर्टाची कॉलर पकडली व ओढाताण केली. कार्यालयाबाहेर निघताना पाहून घेण्याची धमकी दिली. या संबंधी पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून भादंवि १४३, ३५२, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संतोष ढवळे, भावना गवळी, सुरज गावंडे, अशोक भुतडा, महेश पवार, सिकंदर शहा, ॲड. उमाकांत पापीनवार व इतर दोघांचा समावेश आहे. भावना गवळीसह उपस्थित सर्वांवर हा गुन्हा दाखल झाल्याचे यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.