बनावट ई-पासचा वापर करणार्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 02:38 PM2021-05-01T14:38:51+5:302021-05-01T14:39:24+5:30
Crime News : पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी पाठवला असता हा पास बनावट असल्याचे सिद्ध झाले.
रत्नागिरी : कोकणात प्रवेश करण्यासाठी बनावट ई पासचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी रत्नागिरीतील मोहम्मद वसीम रफिक लालू, तन्वीर काझी व अजीम मंगा या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे सर्व लोक आपल्या झायलो गाडीतून कोकणात प्रवेश करीत असताना कशेडी घाट येथे त्यांना तपासणीसाठी थांबविण्यात आले. त्यांनी पोलिसांना पास दाखवला पोलिसांनी तो पास स्कॅन केला असता त्या पासवरील कोड स्कॅन झाला नाही. तसेच पासवरील इंग्रजी अक्षरे लहानमोठी दिसली, त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी पाठवला असता हा पास बनावट असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता रत्नागिरीतील उद्यमनगर येथील राहणाऱ्या अजीम मंगा याने हा बनावट पास तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नावाचा लोगोचा गैरवापर करून बनावट पास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.