मीरा रोडमधील बेकायदा कॉल सेंटरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:26 PM2018-10-29T21:26:32+5:302018-10-29T21:28:08+5:30
परंतु, या कॉल सेंटरचा दुरसंचार विभागाकडील नोंदणीचा पत्ता मालाडचा होता. या शिवाय अमेरीकन कंपन्यांची कामं घेताना दुरसंचार विभागाची परवानगी नसताना कॉल सेंटरमध्ये इंटरनेट कॉल घेतले जात होते.
मीरा रोड - मीरा रोडमध्ये दुरसंचार विभागाची परवानगी नसताना चालणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरविरोधात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनेक परवानग्या नसताना देखील कॉल सेंटर चालवून शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचे समोर आले आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मीरारोडच्या डेल्टा गार्डन समोरील सी. आर. आर्केडमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कुलकर्णी यांच्यासह उपअधिक्षक शांताराम वळवी, काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे व पोलीस पथकाने सदर कॉल सेंटरवर धाड टाकली असता निचेल या नावाने कॉल सेंटर चालवले जात होते.
परंतु, या कॉल सेंटरचा दुरसंचार विभागाकडील नोंदणीचा पत्ता मालाडचा होता. या शिवाय अमेरीकन कंपन्यांची कामं घेताना दुरसंचार विभागाची परवानगी नसताना कॉल सेंटरमध्ये इंटरनेट कॉल घेतले जात होते. बेकायदेशीर कॉल सेंटर चालवतानाच शासनाचा महसुल देखील बुडवला जात होता. पोलिसांना धाडीदरम्यान याबाबत वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी दुरसंचार विभागास कळवले होते. पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोन आरोपी असून याप्रकरणी पोलीस व दुरसंचार विभाग तपास करत आहेत.