फिल्मी स्टाइलने मोक्कातील सराईत फरार आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:17 PM2022-01-20T16:17:38+5:302022-01-20T16:19:18+5:30
Crime News :सोनसाखळी, मोबाईल, वाहनचोरीचे गुन्हे उघड
डोंबिवली: मोक्काचा आणि गेल्या पाच वर्षापासून फरार असलेल्या वाहन, मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्हयातील हसनैन गुलामरजा सैय्यद उर्फ इरानी (वय 28) या सराईत चोरटयाला मानपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांच्या पथकाने केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये त्याला स्थानिक इराणी महिलांचा विरोध मोडून काढीत फिल्मी स्टाईलने पकडण्यात आले. त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून दोन मोबाईल, दोन दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा 2 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोकका कायदयान्वये दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपी तसेच वाढत्या दुचाकी वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपींना पकडण्यासाठी कल्याण पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी स्वतंत्र पोलिस पथकांची निर्मिती केली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी मोरे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल भिसे आणि पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांचे विशेष पथक मोक्काचा आरोपी असलेल्या हसनैन याच्या मागावर होते. खब-यामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार तो आंबिवलीतील इराणी वस्तीत असल्याची माहीती पथकाला मिळाली. पोलिस अधिका-यांसह पोलिस हवालदार सुधीर कदम, सोमनाथ ठिकेकर, पोलिस नाईक संजु मासाळ, सुधाकर भोसले, शांताराम कसबे, पोलिस शिपाई अशोक आहेर, सोपान काकड, प्रशांत वानखेडे, अशोक काकडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, ताराचंद सोनवणो, महिला पोलिस नाईक रश्मी पाटील, सोनाली किरपण आदिंच्या पथकाने हसनैनला पकडले. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, नारपोली, रबाळे,शिवाजी नगर येथील प्रत्येकी १ तर बैंगलोर सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन असे आठ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी दिली.
पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
इराणी वस्तीची चोरटयांचे आश्रयस्थान म्हणून ओळख आहे. अनेकदा पोलिसांनी याठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केले आहे. महिलांना पुढे करु न दगडफेक करणे, पोलिसांचे वाहन अडविणे, आरोपीला पळवून जाण्यास मदत करणो आदि प्रकार कारवाईच्यावेळी स्थानिकांकडून सर्रास घडतात. यात अनेक पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी देखील झाले आहेत. 2008 ला तर पोलिसांना कारवाई दरम्यान गोळीबार करावा लागला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. याउपरही परिस्थिती जैसे थे आहे. हसनैनला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला देखील तेथील महिलांकडून प्रखर विरोध झाला. पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्नही झाला. यात झटापटही झाली. त्यांचा विरोध मोडून काढत हसैननला बेडया ठोकत पोलिसांनी थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले.