सार्वजनीक शौचालयामध्ये महिलांचे चित्रीकरण; पालिका मुख्यालयाबाहेरील धक्कादायक प्रकार, तरूणाला अटक
By नामदेव मोरे | Published: May 11, 2023 06:32 PM2023-05-11T18:32:10+5:302023-05-11T18:34:04+5:30
महिलेच्या दक्षतेमुळे ही घटना निदर्शनास आली असून या प्रकरणी एक तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेरील सार्वजनीक शौचालयामध्ये महिलांचे चित्रीकरण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. महिलेच्या दक्षतेमुळे ही घटना निदर्शनास आली असून या प्रकरणी एक तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे परिसरात राहणारी महिला बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पतीसोबत पामबीच रोडवरून घरी जात होती. नैसर्गीक विधी आल्याने त्यांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेरील सार्वजनीक शौचालयाबाहेर कार थांबविली. शौचालयातील टाईल्सवर मोबाईलचा प्रकाश दिसल्यामुळे त्यांनी वर पाहिले असता बाजूच्या पुरूषांसाठी असलेल्या शौचालयातून कोणीतरी व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आले. महिलेने तत्काळ बाहेर येऊन पतीला याविषयी माहिती दिली. पुरूष शौचालयाला आतून कडी लावली असल्याचे निदर्शनास आले. १० ते १५ मिनीटांनी एक तरूण बाहेर आला. तेथे जमलेल्या नागरिकांच्या मदतीने त्याला तेथेच थांबवून पोलिसांना बोलावण्यात आले. १ वाजता या तरूणाला जवळील एनआरआय पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार महिलेच्या पतीने त्या तरूणाचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये त्याच्या पत्नीसह अजून एक महिलेचा व्हिडीओ चित्रीत केला असल्याचे आढळले. या प्रकरणी संबंधीत तरूणाविरोधात व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा व विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधीतावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे.
सखोल चौकशीची मागणी -
सार्वजनीक शौचालयामध्ये महिलांचे चित्रीकरण करण्याचा प्रकार गंभीर आहे. संशयीत तरूणाची कसून चौकशी करावी. त्याने यापुर्वी असे काही व्हिडीओ काढले आहेत का. व्हिडीओ अजून कुठे व्हायरल गेले आहेत का. अशा प्रकारच्या घटनांमध्ये अजून कोणी सहभगी आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी तक्रारदार महिला व तीच्या नातेवाईकांनी केली आहे.