अहमदाबाद पोलिसांची मुंबईत कारवाई, अमित शाह यांचा फोटो ट्वीट करणाऱ्या फिल्ममेकरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:50 PM2022-07-19T18:50:27+5:302022-07-19T18:51:07+5:30
दास यांची पुढील चौकशी अहमदाबादमध्ये होणार असल्याची माहिती
अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अटकेत असलेल्या केलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघलसोबत फोटो शेअर केल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी मंगळवारी चित्रपट निर्माते अविनाश दास यांना मुंबईतून ताब्यात घेतले. गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक करण्यात आली होती. त्या पूजा सिंघल आणि अमित शाह यांचा एकत्र असलेला एक फोटो दास यांनी ट्वीट केला होता. त्यामुळे अमित शाह यांची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोपाखाली दास यांना मुंबईतून अटक करण्यात आली. तसेच दास यांनी एका महिलेचा तिरंगा परिधान केलेला एक आक्षेपार्ह फोटोदेखील शेअर केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डी पी चुडासामा म्हणाले, "आम्ही दास यांना मंगळवारी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. आता पुढील कायदेशीर प्रक्रिया व चौकशी अहमदाबादमध्ये केली जाईल." अहमदाबाद गुन्हे शाखेने मुंबईस्थित चित्रपट निर्माते दास यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४६९ अन्वये तसेच राष्ट्रीय सन्मानचिन्हांचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार FIR नोंदविला होता. दास यांनी तिरंगा परिधान केलेल्या एका महिलेचा आक्षेपार्ह फोटोदेखील पोस्ट केला होता. Instagram आणि Facebook दोनही अकाऊंटवर हा फोटो केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
४६ वर्षांचे अविनाश दास यांच्याविरुद्ध जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. मनी लॉड्रींग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकारी पूजा सिंघल या अमित शाह यांच्यात कानाजवळ काही तरी सांगत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला होता. अमित शाह आणि पूजा सिंघल यांचा तो फोटो सिंघल यांना अटक होण्याच्या काही वेळापूर्वीचा असल्याचा दावा अविनाश दास यांनी ट्वीटमध्ये केला होता. पण तो फोटो मात्र २०१७ मधील होता. त्यामुळे शाह यांची प्रतिम मलिन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.