चित्रपट निर्माते अविनाश दास यांचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:23 AM2022-05-25T09:23:35+5:302022-05-25T09:23:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे दास यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
गेल्याच आठवड्यात ईडीने आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पूजा सिंघलला अटक केली. न्या. भारती डांग्रे यांनी दास यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत योग्य न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. अहमदाबाद हे मुंबईपासून फार दूर नाही. त्यामुळे दास यांनी अहमदाबाद येथील न्यायालयात अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. ८ मे रोजी दास यांनी अमित शहा व पूजा सिंघल यांचा एकत्र असलेला फोटो दास यांनी पूजा सिंघलला अटक करण्यापूर्वी... असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केला. पाच वर्षांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात शाह आणि सिंघल यांचा काढलेला फोटो दास यांनी पोस्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.