अश्लील व्हीडिओ करणाऱ्याविरुद्ध अखेर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:36 AM2019-02-27T00:36:41+5:302019-02-27T00:36:45+5:30
पुन्हा होणार अटक : पोलीस ठाण्यात रहिवाशांची गर्दी
ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुलामुलींचे चोरुन चित्रण करणाऱ्या अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा ११-१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याआधी विनयभंगाच्या कलम ३५४-क नुसार त्याला अटक झाली होती. आता पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या सर्व महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा ६६- ब आणि पोक्सो ही कलमेही दाखल करण्यात आली आहेत. तळ अधिक सहा मजली असलेल्या ए आणि बी विंगच्या दोन वेगवेगळया इमारतींमध्ये ८३ सदनिका आहेत.
यातील ए विंगच्या इमारतीमध्ये त्याने हा चित्रणाचा प्रकार केला. इमारतीमध्ये जिन्यातून जाताना जवळच बाथरुमच्या खिडक्या आहेत. त्याच खिडक्यांमध्ये रहिवाशांच्या नकळत तो मोबाईल ठेवून चित्रीकरण करीत होता. एक १४ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा, काही महिला आणि पुरुषांचेही त्याने या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच इमारतीमधील इतर रहिवाशांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अटक केली.
आधी हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्याकडे होते. आता ते महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांच्याकडे सोपविले आहे. त्याने मोबाईलच्या माध्यमातून गूगलमध्ये फोटो सेव्ह केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाईसाठी मंगळवारीही रहिवाशांनी कापूबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याच्या मोबाईलमधून २४ अश्लील व्हिडीओ मिळाले असून सायबर सेल क्राईमच्या मदतीने त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याची जामीनावर सुटका झाली असली तरी त्याच्यावर पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमे वाढविली आहेत.
पोलीस कोठडीची केली जाणार मागणी
त्यामुळे जामीन रद्द होऊन त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी सांगितले. त्याच्या जीमेल खात्याचीही पडताळणी केली जात आहे.
त्याने नेमकी किती जणांबाबत हा प्रकार केला, याचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा अटक होणार आहे.