गेवराई न्यायालय परिसरात कौटुंबिक वाद मिटविताना फिल्मी स्टाईल गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:55 AM2018-07-06T11:55:19+5:302018-07-06T11:56:13+5:30
पती -पत्नीचा न्यायालयात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही गटाचे अचानक बिनसले. यातूनच पत्नीकडील लोकांनी पतीकडील चार जणांना दगडाने मारहाण केली.
गेवराई ( बीड) : पती -पत्नीचा न्यायालयात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही गटाचे अचानक बिनसले. यातूनच पत्नीकडील लोकांनी पतीकडील चार जणांना दगडाने मारहाण केली. यात चार जण गंभीर जखमी झाले. न्यायालय परिसरात गुरुवारी दुपारी या घडलेल्या घटनेमुळे काही वेळ प्रचंड गोंधळ उडाला.
हिना जब्बार पठाण (२८ ,रा.चकलांबा ता. गेवराई) हिचा विवाह १९ एप्रिल २००९ रोजी जब्बार अजीज पठाणसोबत (३३ , रा. जाटवळ ता. शिरुर कासार) झाला होता. काही कालावधीनंतर या दोघांत खटके उडत होते. त्यामुळे हिनाच्या वतीने गेवराई न्यायालयात पोटगी व इतर बाबींविरुद्ध तक्रार केली होती. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास न्यायालय परिसरात दोन्हीकडील नातेवाईक जमा झाले. आपसात तडजोड करुन हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मुलीकडील मंडळींनी तुझे पगार पत्रक आमच्या मुलीच्या नावे कर अशी मागणी केली. पतीने नकार दिल्यानंतर शाब्दीक बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले.
मुलीकडील ७ ते ८ जणांनी दगडाने मारहाण केली. यात पती जब्बार पठाण, सासरा अजीज पठाण (६०), इसाक करीम पठाण, दीर अलीम पठाण (सर्व रा. जाटवळा ता. शिरूर कासार) हे चौघे जखमी झाले. मारहाण करणारे चार चाकी वाहनातून पसार झाले. यानंतर पतीच्या गटातील लोकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी शेख पापाभाई, शेख मतीन, शेख शफीक, शेख अख्तर, शेख सद्दाम, शेख काका, शेख सिकंदर, शेख यासीन, शेख कलंदर, शेख राजू यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.