फिल्मी स्टाइलने आरोपींना बेड्या; पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा, एक आरोपी निसटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 09:30 AM2022-08-06T09:30:02+5:302022-08-06T09:30:15+5:30
प्लायवूड व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांपैकी चौघांना अटक.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील हिम्मत नाहर या प्लायवूड व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांपैकी चौघांना शहापूर येथील गोठेघर गावाच्या परिसरातून मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाइलने आठ तासांत गुरुवारी पहाटे अटक केली. नाहर यांची सुखरूप सुटका केली असून, ही कामगिरी बजावताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांप्रमाणे कपड्यांचा पेहराव करून वेशांतर केले होते.
संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत (सर्व रा. डोंबिवली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्वेत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड या नावाने दुकान आहे. ३ ऑगस्टला विश्वकर्मा हा त्यांच्या ओळखीचा व्यक्ती तेथे आला. त्याने प्लायवूडसंदर्भात काही व्यवहार केले. ॲडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो, असे सांगून दुकानापासून काही अंतरावर नाहर यांना घेऊन गेला. तेथून नाहर यांना एका गाडीत कोंबले. या घटनेची माहिती जितू यांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दिली. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील शहापूर येथील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची पथके ग्रामस्थांच्या वेशात गोठेघर परिसरात दबा धरून बसली होती.
थोड्याच वेळात तेथे एका कारमधून तीन व्यक्ती आले. जितू याने आधी काकांना मला माझ्या ताब्यात द्या, असे सांगितले. तुमच्या काकाला जवळच असलेल्या खोलीत ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी पोलिसांनी स्वत:च्या गाड्या आडव्या टाकून कारला घेरले आणि तिघांना अटक केली. आरोपींना घेऊन घराची पाहणी केली असता तेथे आणखीन एक आरोपी आढळून आला, तर आरोपी इक्बाल शेख अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
गुन्ह्यातील कार घेतली होती भाड्याने
गुन्ह्यात वापरलेली कार ही शिर्डी येथे जायचे आहे, हे सांगून एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून रोकडे याने भाड्याने घेतली होती. ही कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.