अखेर स्कुटीवरील 'लव्ह बर्ड'वर गुन्हा दाखल, कायद्यानुसार 'ही' होईल शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 08:33 PM2023-01-18T20:33:17+5:302023-01-18T20:36:31+5:30
लखनौतील गर्दी असलेल्या रस्त्यावर तरुण स्कूटी चालवत आहे आणि तरुणी त्याच्या समोर बसली आहे, ती तरुणी त्या तरुणाला किस करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
लखनौ - सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचा बाईकवरतीच रोमान्स सुरू असल्याचा दिसत आहे. हा व्हिडीओ लखनौमधील हतरजगंजच्या पॉश मार्केटमधील आहे, पॉश मार्केटमधील रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे. या गर्दीतच स्कुटीवर तरुण-तरुणी रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या २७९ आणि २९४ नुसार कारवाई करण्यात येईल. दरम्यान, हा जामीनपात्र गुन्हा आहे.
लखनौतील गर्दी असलेल्या रस्त्यावर तरुण स्कूटी चालवत आहे आणि तरुणी त्याच्या समोर बसली आहे, ती तरुणी त्या तरुणाला किस करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यानंतर, आयपीसीच्या २७९ व २९४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
आयपीसी २७९
भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी २७९ नुसार इतरांना चिडवण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक रस्ते मार्गावर जलदगतीने किंवा बेजबाबदारीने वाहन चालवल्यास, त्याला आरोपी मानण्यात येते. या चालकाकडून मनुष्याला संकट किंवा जखम होईल, असे या कृत्यास ग्राह्य धरले जाते. त्यानुसार, एका विशिष्ट काळासाठी तुरुंगवास, तो सहा महिने वाढवलाही जाऊ शकतो. त्यासोबतच, १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा देण्याचीही तरतूद कायद्यात आहे. दरम्यान, हा जामीनपात्र गुन्हा आहे.
आयपीसी २९४
दुसऱ्यांना चिडविण्याच्या उद्देशाने कोणीही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कार्य केल्यास, अश्लील गाणं, व्हिडिओ किंवा तसे कृत्य केल्यास २९४ नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र, कायद्यात अश्लील या शब्दात विस्तृत अर्थ देण्यात आला नाही. पण, सार्वजनिक ठिकाणी चुंबन, अलिंगन किंवा रोमान्स करत असल्यास त्यास अश्लील मानले जाते. या गुन्ह्यात एका विशिष्ट काळासाठी तुरुंगवास होऊ शकतो. तो तीन महिने वाढवलाही जाऊ शकतो. तसेच, आर्थिक स्वरुपातही दंड देण्यात येऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षेची तरतूद कायद्यानुसार आहे.
नेटीझन्सच्या मागणीनंतर गुन्हा
दरम्यान, नेटकऱ्यांनी या तरुण-तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच, पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. दरम्यान, अशाच प्रकार एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी सोशल माीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ आंध्रप्रदेशमधील होता. या तरुणाविरोधातही पोलिसांनी कारवाई केली होती.