अखेर आसिफ खान यांचा मृतदेह गवसला; आठ दिवसांच्या परिश्रमानंतर पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:48 PM2018-08-24T18:48:25+5:302018-08-24T18:50:10+5:30
अखेर आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना आसिफ खान यांचा मृतदेह वडद-ब्रह्मपुरी गावाजवळील नदी पात्रात वाहून जाताना गवसला.
अकोला: भूखंडाच्या आर्थिक वादातून वाशिम जिल्हा परिषदेची महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे हिने वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घुण हत्या करून त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रात फेकला होता; परंतु मृतदेह मिळत नव्हता. अखेर आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना आसिफ खान यांचा मृतदेह वडद-ब्रह्मपुरी गावाजवळील नदी पात्रात वाहून जाताना गवसला. हा मृतदेह आसिफ खान यांचाच असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली.
भारिप बमसंचे नेते आसिफ खान व वाशिम जि.प.चे विद्यमान महिला बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांच्यात भूखंडाचा आर्थिक वाद सुरू होता. १६ आॅगस्ट रोजी रात्री ज्योती गणेशपुरे हिने आसिफ खान यांना दर्यापूर तालुक्यातील आमला येरंडी येथील बहिणीच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे आसिफ खान तेथे गेले. या ठिकाणी ज्योती गणेशपुरेसह तिचा मुलगा वैभव गणेशपुरे, स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे, वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले आणि अशोक श्रावण साबनकर यांनी आसिफ खान यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी आसिफ खान यांचा मृतदेह एका जीपमध्ये टाकला आणि सोबत त्यांची कारसुद्धा घेतली. म्हैसांग पुलावर आल्यावर आरोपींनी मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी ज्योती गणेशपुरेसह वैभव गणेशपुरे, स्वप्नील वानखडे यांना २१ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर २२ आॅगस्ट रोजी वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले व अशोक श्रावण साबनकर या तिघांना अटक केली. सर्वच आरोपी २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम राबविली; परंतु मृतदेह गवसत नव्हता. अखेर आठ दिवसांच्या प्रयत्नांनंतर आसिफ खान यांचा मृतदेह वडद गावाजवळील नदी पात्रात दिसून आला. दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह आसिफ खान यांचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आसिफ खान यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होतील.
पोहणाऱ्या युवकांना दिसला मृतदेह
वडद-ब्रह्मपुरी परिसरातील काही युवक पूर्णा नदीत दुपारी पोहत असताना, त्यांना एक मृतदेह वाहत असल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती सांगितली. वडद व ब्रह्मपुरी येथील पोलीस पाटलांनीसुद्धा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.