अखेर नगरसेविकेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:14 PM2019-04-26T23:14:02+5:302019-04-26T23:15:26+5:30
सरकारी कार्यालयाचा केला होता गैरवापर
नालासोपारा - गिरीज गावातील असलेल्या मनपाच्या कार्यालयात प्रचारासाठी गैरवापर केला म्हणून वसई पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा नगरसेविका अनिता पापडे आणि 4 ते 5 पुरूष व स्त्रियांवर 188 सह महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायदा 1995 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गिरीज वार्डातील महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय च्या कार्यालयात बविआ नगरसेविका अनिता पापडे व इतर 4 ते 5 महिला आणि पुरुषांनी बविआ पक्षाचे बॅनर लावून आपल्या उमेदवाराच्या स्लिपा, पत्रके वाटून शासकीय कार्यालयाचा 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करीत असल्याचे फोटो गुरुवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली होती. विविध पक्षाच्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर मनपाच्या नवघर माणिकपूर कार्यालयातील मालमत्ता विभागातील अधीक्षक शंकर मांद्रे (55) यांनी गुरुवारी रात्री तक्रार दिल्यावर वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी कार्यालयाचा गैरवापर केला म्हणून तक्रार आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून याचा तपास करत आहे. तपासाअंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात येईल. - साहेबराव कचरे (तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक, वसई पोलीस ठाणे)