...अखेर 'रेमडिसिवीर' ब्लॅक प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या कंत्राटी कामगाराला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:28 PM2020-10-13T16:28:39+5:302020-10-13T16:28:50+5:30
सरकारवाडा पोलिसांकडून कारवाई; चौकशी सुरु
नाशिक : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात रेमडीसिव्हीर इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांना तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी रुग्णालयाच्या एका कंत्राटी कामगाराला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेत कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध मंगळवारी (दि.13) गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोनाबधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडीसिव्हीर या महागड्या इंजेक्शनचा काळाबाजाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी कोरोना कक्षातील कंत्राटी कामगार संशयित दीपक गणेश सातपुते (रा. दाढ बुद्रुक, ता. रहाता, जि.अहमदनगर) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरीब सामान्य जनता औषधोपचार घेते. कोरोनामुळे शेकडो रुग्ण आजारी पडत असून बहुसंख्य रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्युही होत आहे. दुसरीकडे सिव्हील हॉस्पिटलमधील गरीब रुग्णांसाठी असलेले औषधं परस्पर बाहेर विकले जात असल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारी असलेल्या सातपुते यास अटक केली.
रेमडीसिव्हर इंजेक्शन परस्पर बाहेर विकल्याप्रकरणी फिर्यादी औषध निर्माण अधिकारी जितेंद्र गोपाळ सोनवणे यांनी सातपुतेच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. याआधी अनेकदा सिव्हील हॉस्पिटलमधील औषधं आणि इंजेक्शनची परस्पर बाहेर विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पुरावे नसल्याने आणि वरिष्ठांच्या छत्रछायेखाली हे प्रकार बिनबोभाट सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र आता औषधांचा काळाबाजार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक झाल्यानं चौकशीत काळाबाजार करणारे अन्य कर्मचारी तसंच अन्य व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशयदेखील व्यक्त होत आहे.
कंत्राटी कामगाराच्या रूपाने मासा गळाला
रेमडीसीविर इंजेक्शनचा अपहार करून ते स्वतःच्या फायद्यासाठी चार हजार पाचशे रुपयांना विक्री करत जिल्हा शासकीय रुग्णालयाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कर्मचाऱ्याच्या रूपाने मासा पोलिसांच्या गळाला लागला आहे. त्याच्या चौकशीअंती या काळाबाजार मध्ये अजून कोण गुंतले आहे हे समोर येणार असून आता पोलीस तपासाकडे शहराचे लक्ष लागले आहे.