घरफोडीचे २७ गुन्हे करणारे सराईत अखेर गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:14 PM2019-08-20T14:14:34+5:302019-08-20T14:15:48+5:30
आरोपींकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदीचे दागिने, एक चारचाकी गाडी, एक दुचाकी, असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे : एकीकडे घरफोडींच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रासले असताना दुसऱ्या बाजूला गुन्हे शाखा युनिट ३ च्या अधिकाऱ्यांनी घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातून २३ लाख २७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी त्यांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या असून एका फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. दरवेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणाºयांना अखेर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.
जीतसिंग ऊर्फ जीतू राजपालसिंग टाक (वय २३, रा. वैदवाडी, हडपसर), अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ३४, रा. रामटेकडी, हडपसर) व हुकूमसिंग रामसिंग कल्याणी (वय २८, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदीचे दागिने, एक चारचाकी गाडी, एक दुचाकी, गुन्हा करण्याकरिता वापरलेली दोन कटावणी, एक बोल्टकटर, दोन स्क्रू ड्रायव्हर असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. युनिट ३ च्या अधिकाऱ्याकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा शोध घेत असताना १४ आॅगस्टला पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना संबंधित आरोपीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी त्यांचा साथीदार लखनसिंग रजपूतसिंग दुधाणी याच्याबरोबर मागील दीड वषार्पासून घरफोडी करीत असल्याचे सांगितले. तसेच जीतसिंग ऊर्फ जीतू त्यांच्या टोळीचा प्रमुख आहे. आरोपींनी कोथरुड (१२), सिंहगड रस्ता (५), वारजे (३), भारती विद्यापीठ, दत्तवाडी, डेक्कन, हवेली व स्वारगेट येथे प्रत्येकी (१), तर मुंढवा (२) असे घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना पुढील तपासाकरिता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपींचा वराहपालन व लोखंडी हत्यारे बनविण्याचा व्यवसाय असून या गुन्ह्यातील जीतसिंग टाक याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. हुकूमसिंग याच्याविरोधात तीन व फरार आरोपी लखनसिंग दुधाणी याच्यावर घरफोडीचे ९ गुन्हे दाखल आहेत. जीतसिंग या आरोपीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून उर्वरित तीन आरोपींचे शिक्षण चौथी ते पाचवीपर्यंत झाले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बच्चनसिंग व गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
..............
दारू पिण्याच्या बहाण्याने बाहेर पडत असल्याची मिळाली टीप
मागील ७ ते ८ महिन्यांच्या कालावधीत आरोपींनी घरफोडी केल्या होत्या. त्यांचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक होते. पोलिसांनी नियोजनपूर्वक तपास करून त्यांचा शोध घेणे सुरू केले. अशा वेळी आरोपी दारू पिण्याच्यानिमित्ताने बाहेर पडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे एका ठिकाणी दारू विकत घेत असतानाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
..............................
अशी होती घरफोडीची पद्धत
आरोपी बंद फ्लॅटमध्येच घरफोडी करून मुद्देमाल लंपास करीत असल्याची या गुन्ह्यातील तपासावरून दिसून आले. गुन्ह्यात त्यांनी कटावणीचा वापर कुलूप व दरवाजा तोडण्याकरिता केला. सोसायटीतील इतर रहिवाशांना चोरी करीत असल्याचे कळू नये, याकरिता बाहेरून त्यांच्या घराची कडी ते लावून घेत. यामुळे त्यांना मदतीकरिता बाहेर येणे शक्य होत नव्हते. यानंतर घरातील मुद्देमाल चोरी करून इतरत्र कुठेही न थांबता पसार व्हायचे, अशी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.