...अखेर 'त्या' पोलीस अधिकाऱ्याला केले निलंबीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 06:29 PM2019-10-18T18:29:22+5:302019-10-18T18:34:49+5:30
या निलंबनामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.
नालासोपारा - पालघर जिल्ह्यातील कल्याण शाखेत बदली करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना दोन गुन्हे दाखल झाल्याचे कारण देत पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी आदेश काढून निलंबीत केले आहे. या निलंबनामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.
वसई स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांची काही दिवसांपूर्वी पालघरच्या कल्याण शाखेत बदली करण्यात आली होती पण ते तिथे हजर न राहता सुट्टीवर गेले आहेत. माजी पोलीस आयुक्त आणि यूपीचे खासदार सत्यपाल सिंग यांच्यासोबत विचारे यांनी फोटो काढून फेसबुक या सोशल मीडियावर टाकून व्हायरल केल्यावर याचीच तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगण्यात आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात विचारे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एखाद्या लोकप्रतिनिधीस मदत केल्यामुळे 129 (1), (2), (3) लोकप्रतिनिधी कायदा 1991 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 145 कलमानव्ये एन सी 15 ऑक्टोबरला दाखल करण्यात आली होती. हे दोन गुन्हे दाखल झाल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी निलंबित केल्याचे सूत्रांकडून कळते आणि एकूणच विधानसभा निवडणुकीत एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्याने पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.