...अखेर राज्यातील १५५८ उपनिरीक्षकांना बढत्या; पोलीस महासंचालकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 09:22 PM2019-09-01T21:22:28+5:302019-09-01T21:29:53+5:30
पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही सुरु केली.
मुंबई - गेल्या पावणे दोन वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) पदोन्नतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. विविध पोलीस घटकातील तब्बल १५५८ अधिकाऱ्यांना सहाय्यक निरीक्षक म्हणून शुक्रवारी बढती देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक ४०० वर उपनिरीक्षक मुंबई पोलीस दलातील आहेत. बहुतांशजणांना आयुक्तालयातर्गंत पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आलेली आहे.
दिर्घकाळापासून पीएसआयच्या रेंगाळेल्या बढतीबाबतचा प्रश्न ‘लोकमत’ने वारंवार मांडला होता. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही सुरु केली. ‘लोकमत’च्या २१ आॅगस्टच्या अंकात विक्रमी संख्येत बढती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त दिले होते. त्यानुसार मुख्यालयाने पहिल्यादाच एकाचवेळी तब्बल १५५८ पीएसआयना बढतीचे आदेश जारी केले. सध्याच्या परिस्थितीत ही पदोन्नती ११ महिन्यासाठी असून त्यापूर्वी राज्य सरकार किंवा राज्य लोकसेवा आयोगाने या पदांना मंजुरी दिल्यास ती कायमस्वरुपी केली जाणार आहे.