अखेर "त्या" दोन पोलिसांनी मागितली माफी; पोलीस, पालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:57 PM2021-06-24T18:57:53+5:302021-06-24T18:58:17+5:30
Police News : पालिका आणि पोलीस आयुक्तांनी थेट या प्रकरणात मध्यस्ती केल्याने अखेर त्या पोलिसांना पालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली.
ठाणे : घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का लावला याचा जाब विचारुन त्या डंपर चालकाला खाली उतरुन त्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी ठाण्यातील कोर्टनाका परिसरातील रेस्ट या भागात घडला. हा डंपर चालक पालिकेचा कर्मचारी होता. त्याचवेळेस त्याठिकाणाहून पालिका अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा सुरु झाला, त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कायदा आम्हाला नका शिकवू असे सांगत, पोलिसांनी पालिकेच्या त्या दोन उपायुक्तांना देखील हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यात तब्बल अर्धा तास शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. परंतु पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांनी मध्यस्ती केल्यानंतर त्या पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांची माफी मागितली.
गुरुवारी सकाळी घनकचऱ्याचा डंपर रेस्ट हाऊस जवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच वेळेस बंदोबस्तवर असलेल्या पोलिसांनी इथे डंपर लावू नको, दुसरीकडे डंपर लाव असे त्या डंपर चालकाला सांगितले. त्यानंतर मी फोन करुन संबधीत अधिका:यांना विचारतो, असे त्याने सांगितले, तसेच डंपर पुढे घेण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात पोलिसांनी त्याला शिवीगाळ करीत त्याला खाली उतरुन त्याला मारहाण केली अशी माहिती पालिकेच्या सुत्रंनी दिली. त्यानंतर तेथे असलेल्या पालिका अधिकाऱ्याने यात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पंरतु पोलिसांनी त्याला देखील शाब्दीक खडे बोल सुनावले. त्याच वेळेस या भागातून पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरु होणार होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची फळी त्याठिकाणी दाखल झाली होती. त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या दोन उपायुक्तांनी मध्यस्ती करुन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या पोलिसांना शांत करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका असे त्यांनीच त्यांना सुनावले. त्यावरुन हा वाद आणखीनच चिघळला. नेमके काय घडले हे पाहण्यासाठी येथे लोकांना गर्दी झाली होती. अर्धा तास हा वाद सुरु होता. अखेर हे ते दोन पोलीस निरिक्षिक ऐकण्यास तयार नसल्याने आम्ही संबधीत चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करु असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार हे प्रकरण ठाणे नगर पोलीस स्टेशनपर्यंत गेले. परंतु त्याठिकाणी गेल्यानंतर पालिका आणि पोलीस आयुक्तांनी थेट या प्रकरणात मध्यस्ती केल्याने अखेर त्या पोलिसांना पालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली.