पाकिस्तानी क्रिकेटरविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी FIR, आता पोलिसांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 05:11 PM2022-01-12T17:11:19+5:302022-01-12T17:12:20+5:30
यासिरविरुद्ध गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि छळ करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवी दिल्ली - पाकिस्तानचा लेगस्पिन गोलंदाज यासिर शाह याला अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार आणि अत्याचार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी सांगितले की, यासिर आता १४ वर्षांच्या मुलीवर कथित बलात्काराच्या प्रकरणात संशयित आरोपी नाही. कारण यासिरचे नाव चुकून एफआयआरमध्ये जोडण्यात आल्याचे सांगत पीडितेने आपले म्हणणे मागे घेतले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी ही माहिती दिली. यासिर शाहविरुद्ध गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कथित बलात्कार आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पोलिसांनी आपल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, यासिर शाहचा या कथित बलात्कार प्रकरणाशी काहीही संबंध नाही. यासिर शाहचे नाव या खटल्यातून वगळण्याची विनंतीही तक्रारदाराने केली आहे. कथित बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर यासिर शाहने ट्विट केले की, “सत्याचा विजय झाला आहे आणि आता मी माझ्यावर हा खटला दाखल करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे. माझ्यावर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चाहते, कुटुंब आणि पीसीबी यांच्या पाठिंब्याने आणि प्रार्थनांमुळे त्याचा विरोध करता आला. त्यांच्या विश्वासाशिवाय हे शक्य झाले नसते."
मी मानहानीचा खटला दाखल करणार : यासिर
यासिरने पुढे लिहिले की, “मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतो. अशा परिस्थितीत जो माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, तो एका बाजूने देशाचे नाव देखील बदनाम करेल. या आरोपांनंतर मी खचून गेलो आहे. पण मी स्वतःला सावरले आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच सत्य समोर आणण्यासाठी लढलो. तसेच, जे लोक आपल्या देशाचा द्वेष करतात, ते लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे करू शकतात. मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. पाकिस्तान झिंदाबाद!
Allhamdullilah pic.twitter.com/aX9Hw88CFH
— Yasir Shah (@Shah64Y) January 12, 2022
यासिरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला
यासिरविरुद्ध गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी इस्लामाबादमधील शालीमार पोलिस ठाण्यात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि छळ करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये पीडितेने म्हटले आहे की, “यासिरचा मित्र फरहान याने बंदुकीच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. यानंतर मी यासीरशी WhatsAppवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली असता त्याने मला मदत करण्याऐवजी माझी चेष्टा केली आणि त्याला कमी वयाच्या मुली आवडतात, असे पीडितेने सांगितले.