स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या आजी माजी संचालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:01 PM2019-09-20T16:01:47+5:302019-09-20T16:02:43+5:30
गैरव्यवहार, अपहार दडविण्यासाठी नष्ट केले कागदपत्रं
अंबाजोगाई - येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांसह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड नष्ट केल्या प्रकरणी ४७ जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था ही विविध घोटाळे, अपहार व गैरव्यवहारांमुळे कायम चर्चेचा विषय ठरलेली आहे. या पतसंस्थेतील आजी व माजी संचालकांनी सन २००० ते २०१२ पर्यंतच्या कालावधीत संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार, अपहार दडवण्याच्या उद्देशाने संस्थेचे रेकॉर्ड हेतूपुरस्सर नष्ट केलेले आहे. लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे परीक्षण करण्यासाठी वारंवार रेकॉर्ड मागितले. मात्र, ते उपलब्ध करून देण्यात आले नाही. या मागणीसाठी पतसंस्थेच्या काही सभासदांनी रेकॉर्ड उपलब्ध करून द्या. या मागणीसाठी उपजिल्हा निबंधक कार्यालयासमोर विविध मार्गाने आंदोलन केले. मात्र, या संदर्भात कसलीही दखल घेण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्याने जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब फासे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ४७ आजी माजी संचालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम १७५, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे करीत आहेत.
यांच्यावर झाले गुन्हे नोंद :
सुदामती राजमाने, प्रभाकर आरसुडे, मुजीब कुरेशी, महादेव मुंडे, विक्रम दौंड, मोहन गंगणे, हनुमंत काळम, गंगाधर केलुरकर, देविदास तरकसे, मनिषा इंगे, अनंत निकते, अशोक कोपले, संजय नागरगोजे, गिरीधर देशमुख, बालासाहेब मोरे, दादासाहेब पवार, रामराजे आव्हाड, सुनिता काशीद, सूर्यकांत धायगुडे, अंगद घुले, हरिश्चंद्र चाटे, व्यकंटेश गायकवाड, सुनिल धपाटे, शिवहर भताने, शर्मा गायकवाड, सुनिल म्हेत्रे, प्रभावती अवचर, आशालता बोळे, पांडुरंग पांडे, सर्जेराव काशीद, विनायक चव्हाण, भगवान गडदे, संजीव उमाप, वैजेनाथ अंबाड, शशिकांत बडे, रेखा टाक, शैला जाधव, बाळासाहेब बनसोडे, राजेसाहेब सोमवंशी, मन्मथ पोखरकर, शिवहर आकुसकर, रामभाऊ भगत, संजय वाघमारे, बाळकृष्ण चाटे या शिक्षक संचालक व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.