घोषणाबाजी भोवली; आमदार, महापौरांसह २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:33 PM2020-06-11T12:33:43+5:302020-06-11T12:34:06+5:30
जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन
जळगाव : कोरोना रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी, प्रशासनाचा निषेध केल्याच्या प्रकरणात आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे,भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह 22 जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री जमावबंदी व साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित मालती नेहते या बेपत्ता वृध्देचा कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आल्याने रुग्णालयाची अबु्र चव्हाट्यावर आली. सर्वच स्थरातून रुग्णालय प्रशासन व जिल्हाधिकाºयांविषयी रोष व्यक्त होत असताना आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले होते. यावेळी या पदाधिकाºयांनी तुम्ही कोरोन बाधित रुग्णांना सोडून देतात, त्यामुळे रुग्ण संख्या वाढत चालली आहे, याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहेत तसेच ‘भोंगळ कारभार करणारे अधीष्ठाता, जिल्हाधिकारी गो’ अशी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करुन जोरजोरात आरडाओरड केली. विना परवानगी गर्दी व आंदोलन करु नये असे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही या पदाधिकाºयांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
यांच्याविरुध्द दाखल झाला गुन्हा
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसवेक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पिंताबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेश उल्लंघन, भादवि कलम १८८, ११४३,२६९ अन्वये सह राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.