गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांवर निगडीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 08:25 PM2019-10-31T20:25:47+5:302019-10-31T20:35:27+5:30
दुकान बंद करून सर्व आरोपी पळून गेल्याबाबतचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी - सोने गुंतवूणक आणि फिक्स डिपॉझिट करायला सांगून गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक आणि संचालकांनी ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. दुकान बंद करून सर्व आरोपी पळून गेल्याबाबतचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी योहन्नान थोमस (वय ६४, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापक रितेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), संचालक सुनील कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), व्यवस्थापक रवी के नायर, सेतू पनीकर, संचालक आणि इतर सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादी थॉमस आणि त्यांच्या पत्नीला सन २०१२ पासून २८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत सोने गुंतवणुकीत आणि फिक्स डिपॉझिट या स्वरूपात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार, थॉमस आणि त्यांच्या पत्नीने २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.फिक्स डिपॉझिटचा कालावधी संपून देखील गुंतवलेले पैसे आरोपींनी थॉमस यांना परत केले नाहीत. पैसे परत न करता आरोपी दुकान बंद करून पळून गेले. इतर अनेक लोकांचीही आरोपींनी फसवणूक केली असल्याचे थॉमस यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांनी २२ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी केली होती. त्यावेळी ग्राहकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी संबंधितांना संपर्क केला असता ग्राहकांचे पैसे परत करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण दिवस चिंचवड स्टेशन चौकातील गुडविन ज्वेलर्सच्या दुकानात घालवला. पण त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यानंतर, ३० ऑक्टोबर रोजी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.