ठाण्यात चोरी लपवण्यासाठी कार्यालायाला लावली आग : बिल्डरच्या चालकाचा प्रताप उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:10 PM2018-03-25T23:10:44+5:302018-03-25T23:10:44+5:30
केव्हीला येथील बिल्डरच्या कार्यालयाच्या आगीचे नेमके कारण आता सीसीटीव्हीमुळे स्पष्ट झाले आहे. आठ हजारांची चोरी लपविण्यासाठी चालकानेच हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : दोन आठवडयांपूर्वी ‘के व्हीला’ येथील भालेराव कन्स्ट्रक्शनच्या ‘समर्थ आर्केड’ या इमारतीच्या पाच आणि सहाव्या मजल्यावर लागलेली आग ही त्याच बिल्डरचा चालक अमोल कुरुंद (२३, रा. शिळगाव, ठाणे) याने लावल्याचे उघड झाले आहे. आठ हजारांची चोरी लपविण्यासाठी त्याने आग लावून १२ लाखांचे नुकसान केले. त्याला याप्रकरणी राबोडी पोलिसांनी अटक केली असून, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
‘समर्थ आर्केड’ या इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर १२ मार्च रोजी रात्री ११ ते १३ मार्च रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीत बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारणही स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, सीसीटीव्हीचा डीव्हीआर भालेराव यांनी तपासल्यानंतर मात्र या आगीमागील धक्कादायक प्रकार समोर आला. यात त्यांचाच चालक अमोल याने त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल एका पाण्याच्या बाटलीत काढून नंतर वॉचमनजवळ ठेवलेली माचिस घेऊन डीव्हीआर बंद केला. त्यानंतर डुप्लीकेट चावीच्या आधारे कार्यालयाचे शटर उघडून लेखा शाखेच्या टेबलामध्ये ठेवलेले आठ हजार रुपये चोरले. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून टेबलाखाली असलेल्या कागदपत्रांवर बाटलीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात कार्यालयाचे १२ लाखांचे नुकसान झाले. अमोलने केलेले हे सर्वच कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्याचाच डीव्हीआर आता भालेराव यांनी पोलिसांकडे दिल्यानंतर २४ मार्च रोजी याप्रकरणी त्याच्याविरुद्ध चोरीसह, आग लावून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.