Pune Godown Fire: पुण्यातील पिसोळीच्या फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल ३ तास होती धगधगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 09:24 AM2021-11-09T09:24:10+5:302021-11-09T09:24:56+5:30
Pune warehouse Fire: पिसोळी येथील दगडे वस्तीत आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. या आगीची घटना समजताच पुणे व पीएमआरडीएच्या १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या.
पुणे : पिंसोळी येथील दगडे वस्तीमध्ये एका फर्निचरच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. तब्बल तीन तास ही आग धगधगत होती. ३ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अजूनही तेथे कुलिंगचे काम सुरु आहे़ आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पिसोळी येथील दगडे वस्तीत आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. या आगीची घटना समजताच पुणे व पीएमआरडीएच्या १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. गोदाम मालकाने हे गोदाम दोघांना भाड्याने दिले आहे. सुमारे २४ हजार स्क्वेअर फुट असलेल्या या गोदामात फर्निचरचे सर्व लाकडी सामान होते. रात्रीची वेळ असल्याने गोदामात कोणी नव्हते. गोदाम मालक जवळच रहातात. आग लागल्यानंतर तिने रौद्र रुप धारण केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची खबर मिळाली. लाकडी साहित्य असल्याने त्याने पटकन पेट घेतला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या, तोपर्यंत आगीने भीषण स्वरुप धारण केले होते.
आगीची तीव्रता इतकी होती की, पुढे जाऊन पाण्याचा मारा करणे जवानांना शक्य होत नव्हते. अग्निशमन दलाचे जवान हे तब्बल तीन तास आगीची झुंजत होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अद्यापही तेथे कुलिंगचे काम सुरु आहे.