Fire Case : खार येथील आगीत एका महिलेचा मृत्यू; दोन महिलांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:45 PM2021-09-23T21:45:28+5:302021-09-23T21:46:36+5:30
Fire Case : खार येथील घरात लागलेली आग रात्री ऊशिरापर्यंत शमविण्याचे काम सुरु होते.
मुंबई : खार पश्चिमेकडील गुरु गंगेश्वर मार्गावरील नुतन व्हिला बिल्डिंगमधील खोली क्रमांक २२९ मध्ये गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. येथील आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमवितानाच तीन महिलांची आगीतून सुखरुप सुटका केली. यातील हेमा जगवाणी (४०) ही महिला गुदमरल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयाने त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केले.
खार येथील घरात लागलेली आग रात्री ऊशिरापर्यंत शमविण्याचे काम सुरु होते. मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत नसल्याने आणि आग भडकत असल्याने मदतीसाठी आणखी मनुष्यबळ धाडण्यात आले. त्यानुसार, घटनास्थळी आठ फायर इंजिन, सहा जेटी आणि आणखी अग्निशमन दलाचा फौजफाटा दाखल झाला होता, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. शिवाय १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, पोलीस, महापालिकेचा विभागीय कर्मचारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी दाखल झाले होते. आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक साहित्य, इलेक्ट्रिक डक्ट जळून खाक झाले असून, आगीचा धूर संपुर्ण इमारतीसह परिसरात पसरला होता. आग आणि धूरामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. येथील आग शमविण्यासाठी रात्री दहा नंतर देखील अथक प्रयत्न केले जात होते.