नांदेडात खंडणीसाठी पुन्हा गोळीबार; व्यापाऱ्यांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 03:48 PM2019-12-11T15:48:42+5:302019-12-11T15:59:19+5:30
आरोपींनी कपाटातील रक्कम केली लंपास
नांदेड : शहरात ९ डिसेंबरच्या रात्री दशमेशनगर येथे इंदरपालसिंघ भाटिया या आरटीओ एजंटच्या कार्यालयात घुसून गोळीबार करण्यात आला़ यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून कपाटातील हजारो रुपये लंपास करण्यात आले़ याप्रकरणी मंगळवारी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दशमेशनगर येथील घटनेमुळे पुन्हा खंडणीखोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़ आरटीओ एजंट इंदरपालसिंघ भाटिया यांचे दशमेशनगर येथील आरतीया कॉम्पलेक्समध्ये कार्यालय आहे़ सोमवारी रात्री भाटिया हे इतर कर्मचाऱ्यांसह कार्यालयात बसले होते़ त्याचवेळी तोंडाला रूमाल बांधून दोन पिस्तुलधारी कार्यालयात आले़ आल्यानंतर लगेच त्यांनी पिस्तूलातून एक गोळी झाडली़ सुदैवाने ती गोळी फरशीला लागली़ त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही़ गोळीबारामुळे भीतीने गाळण उडालेले सर्व कर्मचारी खोलीच्या कोपऱ्यात उभे राहिले़ त्याचवेळी आरोपींनी कपाटातील रोख रक्कम लंपास केली़ याप्रकरणी मंगळवारी सकाळी भाटिया यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोनि़ प्रदीप काकडे, स्थागुशाचे शिवाजी डोईफोडे यांनी पाहणी केली़
यापूर्वीही व्यापाऱ्यांवर गोळीबार
शहरात यापूर्वीही कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्या नावाने व्यापारी, डॉक्टर मंडळींना खंडणीसाठी धमक्या दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार, बारचालक सुरेश राठोड यांच्यासह आणखी एका व्यापाऱ्यावर आरोपींनी खंडणीसाठी गोळीबार केला होता़ त्यातील गोविंद कोकुलवार हे अद्यापही खाटेवरच आहेत़ सातत्याने खंडणीसाठी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत रिंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या शेरसिंघ ऊर्फ शेराचा खात्मा झाला होता़