दहशत पसरवण्यासाठी चार ठिकाणी गोळीबार; तळेगाव दाभाडे येथील घटना : मावळात खळबळ
By नारायण बडगुजर | Published: June 20, 2024 11:15 PM2024-06-20T23:15:29+5:302024-06-20T23:15:41+5:30
तळेगाव दाभाडे येथे सहा जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे चेहऱ्याला मास्क लावून दुचाकीवरून फिरणाऱ्या सहा जणांनी चार ठिकाणी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. २०) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. दीड महिन्यापूर्वी देखील गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा गोळीबार झाल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली.
तळेगाव दाभाडे येथे सहा जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते. या टोळक्याने गणपती चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती चौक या चार ठिकाणी गोळीबार केला. शाळा चौक येथे त्यांनी दोन गोळ्या झाडल्या. उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तळेगाव दाभाडे येथे दाखल झाली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली. त्यावरून टोळक्याचा माग काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
चोरट्यांनी केला होता गोळीबार...
तळेगाव दाभाडे येथे १० मे रोजी गोळीबार झाला होता. मस्करनेस कॉलनीतील एका बंगल्यात चोरी करण्यासाठी रेकी करत असलेल्या एकाला पोलिस उपनिरीक्षकाने हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत साथीदारासह पळ काढला.
दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. संशयीतांकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे.
- देविदास घेवारे, सहायक पोलिस आयुक्त, देहूरोड विभाग