बंगाली पंजा भागात फायरिंग, १० ते १५ वाहनांची तोडफोड : गुंडांचा हैदोस, प्रचंड तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:35 AM2020-03-16T00:35:34+5:302020-03-16T00:36:14+5:30
तहसील, पाचपावली आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या मस्कासाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या गटात जोरदार धुसफूस सुरू आहे.
नागपूर : गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रविवारी रात्री फायरिंग मध्ये झाले. एका गटाने प्रतिस्पर्धी गटातील गुंडांवर हल्ला चढवला. हाणामारीनंतर गोळीबार केला. नंतर १० ते १५ वाहनांची तोडफोडही केली. या घटनेमुळे मध्यरात्रीपर्यंत मस्कासाथ, बंगाली पंजा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. तहसील तसेच पाचपावलीचा पोलीस ताफा परिसरात पोहचला होता.
तहसील, पाचपावली आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या मस्कासाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या गटात जोरदार धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, दोन गटातील गुंड बंगाली पंजा भागात रविवारी रात्री ११ च्या सुमारास समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. त्यानंतर एका गटातील गुंडाने मोसीन अकोला याच्यावर गोळीबार केला. तर, काही गुंडांनी या भागात उभे असलेली १० ते १५ वाहने फोडली. सुमारे अर्धा तास या भागात गुंडांचा हैदोस सुरू होता. आरडाओरड, शिवीगाळ यामुळे परिसरात प्रचंड तणाव आणि दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसील, पाचपावली आणि लकडगंजची गस्ती पथके त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस तिकडे धावले. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. वाहनांची तोडफोड झाल्याचे पोलीस मान्य करीत होते.
मात्र, गोळीबाराचे आम्हाला पुरावे सापडले नाही, असे पोलीस सांगत होते. मध्यरात्रीपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. कोण जखमी झाले, कुणी हल्ला केला त्याबाबत कसलीही माहिती पोलिसांकडून मिळाली नाही.