दुधाच्या अवघ्या ४०० रुपयांसाठी तिघांची हत्या, पाटण्यात दोन गटांमध्ये गोळीबार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:08 AM2023-09-15T11:08:52+5:302023-09-15T11:10:32+5:30
गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असून शैलेश सिंग, जयसिंग आणि प्रदीप सिंग अशी मृतांची नावे आहेत.
फतुहा : बिहारची राजधानी पाटणाजवळील फतुहा येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून तिघांची (Patna Triple Murder) हत्या करण्यात आली आहे. येथील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरंगापार गावात दुधाच्या पैशावरून झालेल्या वादातून गुरुवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. यात गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असून शैलेश सिंग, जयसिंग आणि प्रदीप सिंग अशी मृतांची नावे आहेत. तर २२ वर्षीय मिंटस कुमार हा गोळीबारात जखमी झाला आहे. त्याला पाटणा येथील एनएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा सुरगा गावात दुधाच्या थकित रकमेच्या मागणीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर हा प्रकार इतका वाढला की दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात दोन्ही बाजूंच्या चार जणांना गोळी लागली आणि यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच, गावातील तणावपूर्ण वातावरण पाहता पोलिसांनी येथे तळ ठोकला आहे. आहे. घटनेनंतर पाटणा ग्रामीणचे एसपी, फतुहा डीएसपी घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमधूनही पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण आहे.
घटनेबाबत गावकऱ्यांनी सांगितले की, दुधाच्या ४०० रुपये थकबाकीबाबत पंचायत होणार होती. गावातील काही लोक दोन्ही पक्षांना एकत्र बसवून हा वाद मिटवणार होते, मात्र गुरुवारी रात्री हे प्रकरण इतके वाढले की तिघांची हत्या करण्यात आली. याचबरोबर, या घटनेबाबत पाटणाच्या एसएसपी यांनी सांगितले की, दुधाच्या थकबाकीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार झाला. चार जणांना गोळ्या लागल्या आहेत. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. एका बाजूने जयसिंग आणि दुसऱ्या बाजूने प्रदीप समोरासमोर होते.