पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांना मोठं यश; उत्तर प्रदेशातून हल्लेखोर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:56 AM2021-10-04T07:56:12+5:302021-10-04T07:57:00+5:30
बोरीवली नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकी वरून पाठलाग करत असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्यात खांबीत सुदैवाने बचावले. मात्र दरवाज्याच्या काचा फुटून उडाल्याने ते किरकोळ जखमी झाले होते.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यावर बोरिवली येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असतानाच, मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एका हल्लेखोरास उत्तर प्रदेशातून रविवारी ताब्यात घेतले. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित हे गेल्या बुधवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी महापालिका मुख्यालयातून गाडीने बोरिवली येथे घरी जात होते. बोरीवली नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकी वरून पाठलाग करत असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्यात खांबीत सुदैवाने बचावले. मात्र दरवाज्याच्या काचा फुटून उडाल्याने ते किरकोळ जखमी झाले होते.
बोरिवलीच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखादेखील या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे, की हल्लेखोर त्या दिवशी महापालिका मुख्यालया बाहेर दुचाकी घेऊन व रेनकोट घालून पाळत ठेऊन होते. खांबीत यांच्या गाडीचा पाठलाग त्यांनी पालिका मुख्यालयापासूनच सुरू केला होता. बोरिवली येथे गोळीबार करून ते पुन्हा वसई - विरारच्या दिशेने निघून गेले होते.
पोलिसांनी खांबीत यांचे कॉल डिटेल्स काढून त्या आधारेसुद्धा तपास सुरू केला होता. टेंडर वाद, पूर्ववैमनस्य, हेवेदावे , मालमत्तेचा वाद, तसेच अगदी राजकीय संबंध, या सर्वच कारणांच्या शक्यता पोलीस तपासत होते.
तर दुसरीकडे मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील व गुन्हे शाखेचे युनिटही खांबीत हल्लाप्रकरणी कसून तपास करत होते. त्यांच्याकडूनही विविध शक्यता पडताळून पाहिली जात होती.
डॉ. महेश पाटील व गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना तपासात मोठे यश मिळाले आहे. रविवारी उत्तर प्रदेश येथून एका हल्लेखोरास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून काल विमानाने त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सदर हल्लेखोर हा पूर्वीसुद्धा गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये होता. त्याला पैशांची गरज होती म्हणून सुपारी घेऊन हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हल्ल्याचे नेमके कारण टेंडर वाद की अन्य काही, हे चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता आहे.