जळगावच्या चौगुले प्लॉट भागात गोळीबार; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:48 PM2021-04-11T17:48:53+5:302021-04-11T17:49:44+5:30
Firing Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात रविवारी पावणे पाच वाजता वाद झाला.
जळगाव : चौगुले प्रभागात रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजता दोन गटात तुफान वाद उफाळून आला. त्यात एका गटाकडून गोळीबार झाला. विक्रम सारवान याच्या कानाला चाटून गोळी गेली, त्यात तो बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. दरम्यान,यावेळी दोन्ही गटाकडून विटा व दगडांचा मारा झाला. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात रविवारी पावणे पाच वाजता वाद झाला.
त्यात दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस जण एकमेकांवर चालून आले. दगड, विटांचा मारा झाला. त्यात एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.शिंदे गटाकडून झालेल्या गोळीबारात विक्रम सारवान हा जखमी झाला आहे. त्याच्या कानाला दुखापत झाली असून तो बचावला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शनिपेठचे निरीक्षक विठ्ठल ससे, शहरचे निरीक्षक धनंजय येरुळे नियंत्रण कक्षातील अधिकारी व आरसीपी प्लाटून घटनास्थळावर दाखल झालेला आहे. दगडफेक करणारे पसार झालेले असून पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. जखमी विक्रम सारवान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आपल्याकडून गोळीबार झाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केलेला आहे, परंतु पोलिसांकडून वस्तुस्थिती तपासली जात आहे.अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. हा वाद होण्याआधी मोबाईलवरच एकमेकांमध्ये वाद झाले होते. दोन्ही गटांतील तरुण पूर्वी सोबतच असायचे, मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद आहेत. रविवारी ते गोळीबार व दगडफेकीने उफाळून आले.