पिस्तूल खरे असल्याचे पटवून देण्यासाठी केला गोळीबार : भोसरीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:33 PM2019-07-20T16:33:30+5:302019-07-20T16:36:30+5:30
पिस्तूल दाखवून तरुणास थांबण्यास सांगितले. मात्र पिस्तूल खोटे आहे..
पिंपरी : पिस्तूल दाखवून तरुणास थांबण्यास सांगितले. मात्र पिस्तूल खोटे आहे, असे तरुणाने सांगितल्यावर पिस्तूल खरे आहे, असे पटवून देण्यासाठी बाजूला गोळीबार केला. यातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. भोसरीतील लांडेवाडी येथे गुरुवारी (दि. १८) रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय सुरेश कांबळे (वय २६, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी कांबळे गुरुवारी त्यांच्या मैत्रीणीस सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी भोसरीतील लांडेवाडी येथे दोन अनोळखी आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यांनी पिस्तूल दाखवून फिर्यादी कांबळे यांना थांबण्यास सांगितले. पिस्तूल खोटे आहे, असे फिर्यादी कांबळे यांनी सांगितल्यावर पिस्तूल खरे आहे, असे सांगून आरोपीने बाजूला गोळीबार केला. त्यानंतर फिर्यादी कांबळे यांनी आरोपीला ढकलले. त्यामुळे आरोपी खाली पडला व त्याच्या हातातील पिस्तूलही पडले. गोळीबार झाल्याचा आवाज आल्याने काही नागरिक तेथे आले. त्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.